फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही.त्यावेळी या महाराष्ट्रात खुप घनदाट जंगले होती.अनेक वटवृक्ष, वेली,झाडे सगळी आनंदात वाढत होती. त्यावर विविध पक्षी,जीव जंतू आणि प्राणी अवलंबून होती.
हळू हळू विकास(?) होऊ लागला. जंगले कापली जाऊ लागली.अनेक मोठे वृक्ष धारातीर्थी पडू लागले.आणि नवीन नवीन उंच इमारतींची सिमेंटची जंगले उभी राहू लागली.
आणि एके दिवशी या शहराच्या टोकाला असलेल्या जंगलाचा नंबर लागला.या जंगलाच्या मध्यभागी एक भला मोठा वटवृक्ष होता. अगदी वयोवृद्ध पणजोबा सारखा.किती वर्ष झाली हा वृक्ष उंभा आहे ठाऊक नाही. कित्तेक पिढ्या त्यांनी बघितल्या. किती वादळे झेलली,किती पावसाळे बघितले.या.पणजोबा वृक्षाची मुळे जमिनीत खोलवर कित्येक किलोमीटर लांबवर गेली असतील याची कल्पनाच करणे अशक्य.
आज या वृक्षाला पाडण्यासाठी पांढरा टॅग लावून गेले होते .
तेंव्हापासून पणजोबा वृक्ष उदास उदास होते.पाने मिटल्यासारखी वाटत होती.आपल्या पणजोबाना असं अस्वस्थ बघून सारीच दुःखी झाली. आता पुढे काय होणार? पुढच्या पिढ्या कशा जगणार?
इतक्यात पणजोबांची पतवंडे ... त्यांच्याच सावलीत वाढत असलेली ,त्यांच्याच छत्र छायेखाली जगत असलेली,तरुण सळसळणारं रक्त असलेली,पुढे सरसावली.पणजोबा एवढे हताश,हतबल होऊ नका आम्ही तुमच्यावर मुळीच घाव घालू देणार नाही.काही ना काही मार्ग निघेलच यातून.या जगात वृक्ष प्रेमी माणसे आहेतच. जी वृक्ष झाडे वेली यावर प्रेम करतात,जपतात, माया लावतात. तुकोबांनी म्हटलेलं आहे' वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे ' अशी जपणारी वारकरी मंडळी नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. हे ऐकून पणजोबा थरारले.समाधान पावले आणि त्यांची पाने एकमेकांवर आपटून गाऊ लागली ' राम कृष्ण हरी,राम कृष्ण हरी ' आणि ' ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम '
*सौ.पूर्वा.लाटकर*
*२३ जुलै २०२६*
Comments
Post a Comment