चतुर कावळा

 *नेक्स्ट जेन चतुर कावळा*


ऐन ऑक्टोबर हीटचे दिवस होते.सगळीकडे प्रचंड उकाडा. जणू काही  उन्हाळा चालू आहे.शहरात तर अजूनच जास्त जाणवत होते ऊन!उंच उंच इमारती.काचेची तावदाने.सगळीकडे काँक्रीटचे रस्ते .झाडे अगदी शोभेपूरतीच उरली आहेत.त्यात रस्त्यांवर बेसुमार वाहने.त्यांचा धूर, कर्णकर्कश आवाज येत असल्याने अजूनच बेजार होतात सगळे.

      

अशातच भर दुपारी  शहराच्या मध्यवर्ती भागात कुठुनसा एक दमलेला ,थकलेला आणि तहानलेला कावळा एका इमारतीच्या खिडकीत बसला.त्याने खुप शोध घेऊन,प्रयत्न करूनही पाण्याचा थेंबही दिसेना.घरातली माणसेही त्याला हुसकावून लावत होती.कावळ्याला त्याच्या खापर पणजोबांची गोष्ट आठवली.आजही पिढ्यान् पिढ्या ती  हुशार कावळ्याची गोष्ट अगदी अभिमानाने आणि रंजकपणे सांगितली जाते.त्याला आपले पणजोबा आठवले. त्यांनीही धीर सोडला नाही.निराश झाले नाहीत.की खचले नाहीत.त्याही परिस्थितीत त्यांनी आपलं डोकं चालवलं. अगदी तळाला पाणी असलेल्या  मडक्यातून त्यांनी कसे बारीक बारीक खडे आणून पाणी वर आणले आणि तहान भागवली.मी पण त्यांचाच पणतू आहे. प्रयत्न तर करणारच.तशाही अवस्थेत त्याला हुशारी आली.तो पुन्हा अगदी बारकाईने सगळीकडे पाणी शोधू लागला.आणि कावळ्याचे डोळे अचानक चमकले.त्याला असं काहीतरी दिसलं की ज्यामुळे तहान भागेल.

काय होतं ते? त्याच्या पणजोबाना दिसला तसा माठ ! नाही नाही ते तर कुठुतरी थेंब थेंब पडणारं पाणी होतं.एका उंच इमारतीच्या वातानुकुलित यंत्रातून बाहेर सोडलेल्या पाईपमधून गळणार पाणी होतं.पाणी तर दिसलं.घसा कोरडा पडला होता. तहानेने जीव अगदी कंठाशी आला होता. तिथपर्यंत पोहोचणे काही सोपे नव्हते.पंखात बळ आणून अजून उंच उडावे लागणार होते.त्याने धीर एकवटला. सगळा जोर लावला. पाईप जवळ पोहोचला.पाईप वाऱ्याने हलत होता. स्वतःचा तोल सावरत.आपली पायाची नखे मजबूत पकड धरत तो पाणी गळणाऱ्या टोकाजवळ पोहोचला.

मान खाली करून एक एक थेंब पडणारे पाणी पिऊ लागला. बऱ्याच वेळा पाणी पिऊन त्याच्या अंगात बळ आलं.तो आता ताजा टवटवीत झाला.त्याची तहान पूर्णपणे शमली होती.

अशा रीतीने मोठ्या हुशारीने त्याने आपली तहान भागवली.आणि तो तिथून मार्गस्थ झाला. जाता जाता त्याच्या मनांत विचार घोंगावू  लागले.


माझ्या पणजोबानी हुशारी दाखवली.मी पण मोठ्या हिकमतीने तहान भागवली.पण पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी 

पाणी शिल्लक राहणार आहे का!



*सौ.पूर्वा लाटकर*

*२० सप्टेंबर २०२६*

Comments